प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : तिसंगी पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, गणातील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असली, तरी नवीन चेहरा, स्वच्छ प्रतिमा आणि थेट जनसंपर्क असलेले राजेश सातपुते हे नाव सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
गणातील सामाजिक समतोल, युवकांची वाढती भूमिका आणि महिला मतदारांचा निर्णायक प्रभाव लक्षात घेता, यावेळी मतदार वादविरहित, विश्वासार्ह आणि कामातून ओळख निर्माण केलेल्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राजेश सातपुते यांचे नाव सर्वाधिक प्रभावीपणे पुढे येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवामुळे प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि जनतेचे प्रश्न यांची त्यांना सखोल जाण आहे. महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी गणातील प्रत्येक गावात थेट पोहोच निर्माण केली आहे. दाखले, योजना, ऑनलाईन सेवा यासाठी नागरिकांना मदत करताना त्यांनी स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यशैलीची छाप पाडली आहे.
स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांशी व तरुणांशी त्यांचा सतत संपर्क असून, युवकांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसते.
त्यांच्या आई स्वर्गीय छाया सातपुते या अंगणवाडी सेविका असल्याने गावागावातील कुटुंबांशी त्यांचे भावनिक नाते घट्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहिल्याने महिला मतदारांमध्येही त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. अल्पावधीतच ‘प्रामाणिक, होतकरू आणि काम करणारा तरुण नेता’ अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश सातपुते हे महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना डावलण्यात आल्यास ते अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी ठेवून असल्याचीही चर्चा आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तिसंगी गणातील राजकीय गणिते पूर्णतः बदलू शकतात, याची जाणीव पक्ष नेतृत्वालाही होऊ लागली आहे.
मतदानाच्या दृष्टीने तिसंगी गाव गणात निर्णायक ठरत असल्याने येथूनच सक्षम, जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देणे पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा उमेदवारी इतर गावाकडे गेल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, तिसंगी पंचायत समिती गणातून नवीन, सर्वसमावेशक आणि विजयी उमेदवार म्हणून राजेश सातपुते यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांकडून जोर धरू लागली असून, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण गणाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या