प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचे तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत.या कारवाईनंतर सोशल मीडियावर सांगलीतील भाजप नेत्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून,गिड्डे यांच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी एका पत्रकार परिषदेत संदीप गिड्डे यांच्या निलंबनाची घोषणा केली होती.पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र,ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाविरोधात संतापाची लाट उसळली.'बाहेरून आलेल्यांकडून निष्ठावंतांवर कारवाई'
असं म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी या कारवाईचा खरपूस समाचार घेतला आहे.यामध्ये प्रामुख्याने दोन उपरोधिक टोले चर्चेचा विषय ठरत आहेत.त्याचबरोबर लोकसभेला पक्ष विरोधी काम करणाऱ्या व संजय काका पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही अशा प्रकारचे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते."तलाठ्याकडून तहसीलदारांचे निलंबन" गिड्डे यांची कामाची व्याप्ती आणि त्यांचा जनसंपर्क पाहता,ही कारवाई अधिकार नसताना केल्यासारखी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
"आयात नेत्यांकडून निष्ठावंतांचे खच्चीकरण"काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या संदीप गिड्डेंसारख्या स्वयंसेवकावर कारवाई करणे,हा भाजपमधील निष्ठावंतांचा अपमान असल्याची चर्चा रंगली आहे.संदीप गिड्डे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी प्रश्नांवर आणि मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली आहे.त्यामुळेच त्यांच्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राज्यभरातून गिड्डे यांच्या बाजूने पोस्ट शेअर करत आहेत.किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयामुळे अस्वस्थता असून, "आबा आम्ही तुमच्या सोबत आहोत" असे हॅशटॅग ट्रेन्ड होत आहेत.
भाजपसाठी धोक्याची घंटा?
संदीप गिड्डे यांनी नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनात देखील भाजपच्या बाजूने खंबीर भूमिका घेतली होती
तसेच बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनादेखील सरकारी पक्षाच्या बाजूने अनेक वृत्तवाहिन्यावरती डिबेटमध्ये सहभाग घेऊन पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली होती.
मात्र भारतीय जनता पक्ष मराठा व शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वापरतो आणि फेकून देतो अशा त्रिव्र प्रकारच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे.निवडणुकीच्या काळात संदीप गिड्डेंसारख्या जनसंपर्क असलेल्या नेत्यावर कारवाई करणे भाजपला महागात पडू शकते,असा सूर राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे.सांगली भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून,या ट्रोलिंगमुळे स्थानिक नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे.
सध्या एकूणच सोशल मीडियावरील वाढता विरोध पाहून भाजप विरोधातील वातावरण तयार होत आहे.त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या प्रकरणात हस्तक्षेप करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या