प्रतिष्ठा न्यूज/ दीपक शिंत्रे
विजयपूर, दि. 11: जिल्ह्यातील कूडगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोलसंगी गावाजवळील कॅनरा बँकेच्या एटीएममधून झालेल्या ₹19.29 लाखांच्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणी हरियाणा व उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता विजयपूर–आलमट्टी राष्ट्रीय महामार्गालगत गोलसंगी गावाजवळील कॅनरा बँकेच्या एटीएमच्या शटरला लावलेले कुलूप चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर एटीएम मशीनचा सेफ डोअरही गॅस कटरने कापून मशीनमध्ये असलेली ₹19,29,000 रुपयांची रोकड चोरून नेली होती. याबाबत गोलसंगी कॅनरा बँक शाखेचे व्यवस्थापक शरणप्पा साबू होनवाड यांनी कूडगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत विजयपूर जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली. पथकांनी घटनास्थळासह राष्ट्रीय महामार्गावरील विविध ठिकाणी तपास सुरू केला. तपासादरम्यान एक संशयित वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मध्य प्रदेश पोलिसांना संशयित वाहनाची माहिती देऊन त्याची तपासणी करण्याची विनंती करण्यात आली.
विजयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कांवाय पोलिसांनी दि. 3 सप्टेंबर रोजी दिल्ली–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील घाटा–नागदा–निमाच टोलनाक्याजवळ रात्री गस्तीवर असताना संशयित स्कॉर्पिओ वाहन व त्यातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि याबाबत विजयपूर पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर विजयपूर जिल्ह्यातील तपास पथक दि. 4 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशात पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे साहिल मेहमूद (24), रा. धिरंकी, जि. पलवल, हरियाणा; कमरियाब सत्तार (50), रा. सफियाबाद लोटी, मुंडाली, उत्तर प्रदेश; आणि आकाश प्रदीप त्यागी (27), रा. बिझोली, जि. मेरठ, उत्तर प्रदेश अशी आहेत.
आरोपींची चौकशी केली असता हरियाणा व उत्तर प्रदेशातील एकूण सहा जणांनी मिळून ही चोरी केल्याचे समोर आले. हे आरोपी सराईत चोर असून, गुगल मॅपच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एटीएमची माहिती शोधून, चोरीसाठी सोयीस्कर एटीएमची निवड करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गोलसंगी येथील कॅनरा बँकेचे एटीएम लक्ष्य करून दि. 2 सप्टेंबर रोजी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून ₹3.60 लाखांची रोकड, एम. एच. -12- एक्स एच-5112 क्रमांकाची स्कॉर्पिओ कार, एक स्क्रूड्रायव्हर आणि गॅस कटर जप्त करण्यात आले आहे.
या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गुन्ह्याचा छडा लावण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, आयपीएस यांनी कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या