प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर, दि. 11: इंडी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लच्याण गावात झालेल्या व्यक्तीच्या खूनप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
लच्याण येथील मल्लम्मा मल्लप्पा भंडारी (वय 60) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अनिल ऊर्फ सुखदेव भंडारी (वय 40) याचा दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान गावातील सरकारी शाळेच्या आवारात धारदार शस्त्राने तोंडावर, मानेवर आणि उजव्या खांद्यावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी इंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाच्या तपासासाठी सीपीआय सुनील बी. पाटील आणि पीएसआय (कायदा व सुव्यवस्था) राजू ममदापूर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी लच्याण एस.के. नगरातील मजूर चौडप्पा ऊर्फ आकाश शिवकुमार कांबळे (वय 22) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री आरोपी आणि मृत अनिल ऊर्फ सुखदेव हे दोघेही सरकारी शाळेच्या आवारात दारू पीत होते. त्यावेळी 2022 मध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या प्रकरणातील तडजोडीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने आपल्या घरातून कुऱ्हाड आणून अनिलच्या तोंडावर, मानेवर आणि उजव्या खांद्यावर वार करून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली असून, आरोपीच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
प्रकरणाचा छडा लावणाऱ्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या