प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : स्वच्छ सर्वेक्षण २०२६ व ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर तासगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ‘पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.पर्यावरण संवर्धन,स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश देत गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.नगराध्यक्षा सौ.विजया बाबासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान व आरोग्य सभापती सौ.संध्या संजय लुगडे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.शहरातील गणेश मंडळांनी उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
*पर्यावरणपूरक उपक्रमांना मिळणार गुण*
स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक सजावट,स्वच्छ व हरित परिसर,वृक्षारोपण,पाणी बचत,स्वच्छता व पर्यावरण जनजागृती, ‘सेल्फी विथ इको फ्रेंडली बाप्पा’, ‘माझी वसुंधरा हरित शपथ’ (E-Pledge), पर्यावरणपूरक विसर्जन,कचरा वर्गीकरण तसेच सामाजिक प्रबोधनपर उपक्रमांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार आहे.
*सार्वजनिक मंडळांसाठी रोख बक्षिसे*
सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ १ हजार रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
*घरगुती गणेशोत्सवालाही प्रोत्साहन*
घरगुती गणेश मंडळांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय ३ हजार,तृतीय २ हजार रुपये,तर उत्तेजनार्थ १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
१६ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी
या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पूर्णपणे मोफत असून अंतिम नावनोंदणी १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत करता येणार आहे.स्पर्धेचे अटी व नियम तासगाव नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.स्पर्धकांनी गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक सजावट व उपक्रमांचे फोटो,व्हिडिओ आणि आवश्यक माहिती नगरपरिषदेकडे सादर करावी.
अधिक माहितीसाठी परशुराम गायकवाड – ९९७०१०९३०३ व दर्शना वाघमोडे – ९०६७१०४७०३ यांच्याशी संपर्क साधावा.
‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आपली जबाबदारी’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारण्यासाठी तासगाव शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन नगराध्यक्षा सौ.विजया बाबासो पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,आरोग्य सभापती सौ. संध्या संजय लुगडे व मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या