सांगली: जी. एच. रायसोनी नागपूर व कल्पना फाउंडेशन नागपूर पुरस्कृत, सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, H2E पॉवर सिस्टिम प्रस्तुत १५ वर्षांखालील खुली व मुलींच्या स्वतंत्र फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक, सांगली येथे शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राधेय फाउंडेशनचे प्रमुख डॉ. गणेश चौगुले, देशपांडे बिल्डर्स समूहाचे हृषीकेश देशपांडे, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व चितळे उद्योग समूहाचे प्रमुख गिरीश चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे, मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी, केपीज् चेस अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विजयकुमार माने, आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, तसेच करण परीट व अमेय पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधून निवड झालेले तब्बल २५० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खुल्या गटातील चार मुले आणि मुलींच्या गटातील चार मुली, अशा एकूण आठ खेळाडूंची तेलंगणामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील युवा बुद्धिबळपटूंसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
फिडेकडून प्राप्त होणारे क्लासिकल आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्यासाठी १५ वर्षांखालील खेळाडूंना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. फिडेच्या स्विस पद्धतीनुसार होणाऱ्या या स्पर्धेत एकूण आठ फेऱ्या खेळविण्यात येणार असून, प्रत्येक डावासाठी ६० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद बोनस अशी वेळ प्रणाली आहे.
खुल्या गटात ११४ आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त व ५६ बिगरमानांकित, तर मुलींच्या गटात ५० आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त व २८ बिगरमानांकित खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
खुल्या गटात आयान सोमाणी (पुणे), विश्वादित्य अवस्थी (नागपूर), अथर्व सोनी (ठाणे), विवान सोनी (कोल्हापूर), तसीन ताडवी (जळगाव), भुवन शितोळे (पुणे), आदित्य चव्हाण (सांगली), हित बलदवा (कोल्हापूर), रायण मर्चंट (मुंबई उपनगर) यांसह अनेक मानांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.
मुलींच्या गटात WCM निहिरा कौल (पुणे), AIM भूमिका वाघळे (छत्रपती संभाजीनगर), साई पाटील (पुणे), प्रिशा मर्गज (मुंबई), परिधी गांधी (बुलढाणा), मिशका त्रिपाठी (मुंबई उपनगर), सान्वी गोरे (सोलापूर), प्रणिता भावा (मुंबई उपनगर), मयंका राणा (पालघर), सम्रादणी पाटील (सातारा) यांच्यासह मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे.
स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी), आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर (सांगली), राष्ट्रीय पंच करण परीट (इचलकरंजी), विजयकुमार माने (सांगली), अपर्णा शिंदे (सातारा), यश लोहाना (कराड), रोहित पोळ (इचलकरंजी), राज्य पंच नाझिया पटेल (मिरज) आणि अनिता भोसले (जांभळी) काम पाहत आहेत.
सांगलीत फिडे मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यामागील उद्देश १५ वर्षांखालील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून देणे, हा असल्याचे स्पर्धा संयोजक गिरीश चितळे आणि संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या