प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :रुग्णाच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटणारे समाधानाचे हास्य आणि त्याच्या नातेवाईकांच्या मनातील आनंद यापेक्षा मोठी कमाई कोणतीही असू शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील सेवा ही केवळ व्यवसाय नसून अत्यंत पवित्र आणि उदात्त सेवा आहे.तासगावच्या लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून सुरू असलेले रुग्णसेवेचे कार्य उल्लेखनीय व गौरवास्पद आहे,अशा शब्दांत लातूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विनोद चव्हाण यांनी लाईफकेअरच्या कार्याचे कौतुक केले.तासगाव येथील लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला RTO विनोद चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधा आणि सुरू असलेल्या कार्याची माहिती घेत त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.‘‘इतर कोणत्याही क्षेत्रातील कामाचे मूल्य असते; मात्र वैद्यकीय क्षेत्रातील कामाचे मूल्य पैशात मोजता येत नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे आणि तो आनंद स्वतः अनुभवणे इतर कोणत्याही व्यवसायात शक्य होत नाही. अशा पवित्र आणि उदात्त सेवेचा आपण सर्वजण भागीदार आहात, याचा मला आनंद आहे,’’ असे चव्हाण यांनी सांगितले.
लाईफकेअर हॉस्पिटलचे काम खरोखरच उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. भविष्यातही आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देत रुग्णसेवेत आपला अग्रक्रम कायम ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर यांनी विनोद चव्हाण यांचा सत्कार केला.अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. इंद्रजीत बागल, डॉ. संदेश पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. पोळ, डॉ. जोशी, श्री. विरकर, काजल शिंदे, मनोज थोरबोले, प्रियंका अमृतसागर, रूपाली पवार, संजना रोकडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत संचालक प्रताप घाडगे यांनी केले, तर आभार संजय तुपे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या