प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे कामकाज सुरू करण्याच्या प्रक्रियेला बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई व कुचराई होत असल्याचा आरोप करत कवठे महांकाळ वकील संघटनेने प्रशासनाविरोधात साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यासोबतच तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र प्रांत कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठीही वकील संघटना आक्रमक झाली असून, या दोन्ही मागण्यांसाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे कामकाज तातडीने सुरू झाल्यास तालुक्यातील नागरिकांना न्यायासाठी अन्य ठिकाणी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्याबरोबरच न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, सोयीची व परवडणारी होण्यास मदत होणार आहे. मात्र, महत्त्वाच्या या विषयाकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नाराजी वकील संघटनेने व्यक्त केली आहे.दरम्यान, कवठे महांकाळ तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय तालुक्याच्या ठिकाणीच स्थापन करण्याची मागणीही वकील संघटनेने लावून धरली आहे. महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना बाहेरील ठिकाणी जावे लागत असल्याने वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र प्रांत कार्यालय असणे ही नागरिकांची गरज आणि हक्क असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.लोकप्रतिनिधींची भूमिका, स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि यंत्रणेच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे हे दोन्ही प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोप वकील संघटनेने केला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.हा केवळ वकिलांचा प्रश्न नसून कवठे महांकाळ तालुक्यातील लाखो नागरिकांच्या न्यायाच्या हक्काचा आणि प्रशासकीय सुविधांचा प्रश्न आहे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा तालुक्याच्या ठिकाणीच मिळाव्यात, यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे कवठे महांकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्षा विद्या पाटील, ज्येष्ठ सभासद, इतर सभासद तसेच महिला सभासदांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या