प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० वरील प्रस्तावित तासगाव बायपास शहरालगतून नेण्यास बाधित नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून,या निर्णयाविरोधात आता कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आल्याचे समजते.पुनदी रोड येथील हॉलमध्ये गुरुवारी (दि.३१ जुलै) झालेल्या बैठकीत शेकडो बाधित नागरिक उपस्थित होते.यावेळी बायपासच्या प्रस्तावित मार्गाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत “शहरालगतचा बायपास नकोच” अशी ठाम भूमिका घेण्यात आली.प्रस्तावित बायपास शहराच्या अगदी जवळून जात असल्याने शहरालगतच्या नागरिकांची घरे, व्यावसायिक दुकाने, बिनशेती व नियमितीकरण केलेले प्लॉट, तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याची रुंदीही अधिक राहणार असून, त्यामुळे भूसंपादनाचा फटका मोठ्या संख्येने नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.*शहराच्या विकासासाठी बायपास आवश्यक असला* तरी त्यासाठी शहरालगतची घरे-दुकाने आणि शेती उद्ध्वस्त करण्याची गरज काय? असा सवाल बाधित नागरिकांनी उपस्थित केला.इतर शहरांप्रमाणे तासगावचा बायपासही शहरापासून किमान तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नेण्यात यावा,अशी मागणी बैठकीत करण्यात आली.याबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून पर्यायी मार्ग निश्चित करण्यासाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मागणी मान्य न झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारण्याचा इशारा बाधित नागरिकांनी दिला.बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना बायपासच्या नावाखाली नागरिकांचे संसार, व्यवसाय आणि जमिनी उद्ध्वस्त होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे तासगाव बायपासच्या प्रश्नावर आता बाधित नागरिक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या