सांगली २६ जुलै : रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अरुण भंडारे यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने ३० नवीन सायकली क्लबला मंजूर केल्या होत्या. या उपक्रमाला आणखी अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले ते क्लबमधील रोटेरियन्सनी या सायकलींचे दातृत्व स्वीकारल्यामुळे.
रोटरी हॉल, गणेशनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सायकलदाते रोटेरियन्सच्या शुभहस्ते आज ३० विद्यार्थ्यांना सायकली प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हा या उपक्रमाचा खरा पुरस्कार ठरला.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष रो. महेश झंवर यांनी, “समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत रोटरीचा हा छोटासा सहभाग त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. तर सचिव रो. डॉ. अभिजित उदगांवकर यांनी, “सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे. समाजातील गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हेच रोटरीच्या सेवाभावी कार्यामागील खरे प्रेरणास्थान आहे,” असे सांगितले.
विशेष म्हणजे, याच रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये यापूर्वीही दिवाळीच्या निमित्ताने क्लबतर्फे १० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. तसेच, क्लबमधील रोटेरियन्सनी एकल पालकत्व असलेल्या २८ मुलांच्या एका वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या शिक्षणाला भक्कम आधार दिला आहे.
रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये रोटरी क्लब ऑफ सांगलीने विविध समाजोपयोगी आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले. यामध्ये महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर, नेत्रतपासणी व दंततपासणी शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, वंचित व गरजू बालकांसाठी भोजन व्यवस्था, गरजूंसाठी ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण मोहिम यांसह अनेक समाजहिताचे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.
अनेक ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शाळा व शैक्षणिक उपक्रमांसाठी दूरचा प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी ही सायकल त्यांच्या स्वप्नांना गती देणारी ठरणार आहे. सायकल हे केवळ प्रवासाचे साधन नसून शिक्षणाच्या दिशेने आत्मविश्वासाने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
रोटरी वर्ष २०२५-२६ मधील हा रोटरी क्लब ऑफ सांगलीचा अखेरचा समाजोपयोगी प्रकल्प ठरला. ‘सर्व्हिस अबॅाव्ह सेल्फ’ या रोटरीच्या ब्रीदवाक्याला साजेसा असा हा उपक्रम वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध सेवाकार्यांचा सुंदर समारोप ठरला असून, समाजहिताची आपली अविरत वाटचाल भविष्यातही अशीच सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सांगलीचे संचालक , तसेच रो अभय भगाटे, रो डॉ मुकुंद उदगांवकर, रो समीर गाडगीळ, रो प्रमोद पाटील, रो डॉ भास्कर ताम्हणकर, रो हर्षद कुलकर्णी, रो उदय पाटील, रो सिद्धार्थ मगदूम, रो अभिनंदन पाटील, रो डॉ अभिजित लेंडवे, रो चिदम्बर मगदूम, रो वर्धमान पाटील असे सायकलदाते सदस्य व इतर रोटेरियन्स,विद्यार्थी, पालक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या