सांगली प्रतिनिधी : गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग १६६-इ मधील विटा ते नागज महामार्गाच्या उर्वरीत दहा किलोमीटर टप्प्याच्या कामासाठी अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पीडब्ल्यूडी विभागाकडून ९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दीर्घकाळ पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे खासदार विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोकण-कर्नाटकला जोडणारा आणि जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून गुहागर-विजापूर महामार्गाकडे पाहिले जाते. हा महामार्ग रत्नागि ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला नागज येथे छेदतो. तो कोकणाला मराठवाडा व विदर्भाशी जोडतो. त्यामुळे एकाचवेळी कोकणाची दोन टोकांना पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याचे काम होणार आहे. त्याची विटा शहराशी कनेक्टिव्हिटी थेट होणार असल्याने विटा ते नागज हा महत्वाचा आहे. या मार्गाला २०१८ मध्ये मूळ तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यातील ३६ किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. नागजच्या बाजूला सुमारे दहा किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. त्यासाठी वन जमिन अधिग्रहण महत्वाचे आहे. नागज, रेवणगाव येथील तीन घाटातील वन जमिनीचा विषय अडचणीचा ठरला होता. तो विषय मार्गी लागल्यानंतर प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव चर्चेला होता. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने अखेर त्याला प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी ९५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात १० मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग असणार आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असून त्यात पुलांचाही समावेश आहे.
या कामासाठी खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. खासदार पाटील यांनी नुकतीच श्री. गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रशासकीय मान्यतेच्या विषयाला गती मिळाली. केंद्रीय सचिव शशी भूषण कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामाबाबतचे आदेश दिले आहेत.
नागज महत्वाचा टप्पा
गुहागर ते विजापूर हा ३२० किलोमीटर अंतराचा महामार्ग आहे. तो गुहागर, चिपळूण, पाटण, कराड, कडेगाव, विटा, खानापूर, जत, विजापूर असा जातो. तो कोकणाला पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकशी जोडतो. नागज येथे तो रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला छेदतो. हे जिल्ह्यातील दोन महत्वाचे महामार्ग आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या