सांगली - दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या सांगली येथे उभारण्यात आलेल्या अस्मितेचे, एकतेचे आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज कोल्हापूर यांच्या शुभहस्ते व जैन सिद्धांत प्रसारक मंडळाचे जीवनदादा पाटील, द. भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. व्यासपीठावर संघटक सुभाष दगडे, सुहास काटकर, प्राचार्य अशोक साळवी यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना द. भा. जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले दि. जैन कासार संस्था महाराष्ट्राच्या बहुसंख्य जिल्ह्यात पसरली आहे. आपण संपूर्ण जैन कासारांना संघटित केलात. असेच संघटीत राहून समाजाची प्रगती करावी. द. भारत जैन सभा आपल्या पाठीशी आहे.
शुभेच्छा देताना जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व द.भा. जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, दि. जैन कासार समाज संस्थेने अल्पावधीतच संस्थेने खुप प्रगतीचे टप्पे गाठले आहेत. जैन समाजाने आपल्याच समाजातील अनेक गरजू, होतकरू तरुण-तरुणींना आणि लहान व्यवसायिकांना आर्थिक पाठबळाची खूप मोठी गरज आहे. हीच गरज ओळखून आपल्या मदतीसाठी 'जैन आर्थिक विकास महामंडळ' खंबीरपणे उभे राहिले आहे. शिक्षणासाठी कर्ज, नव्या व्यवसायासाठी कमी व्याजदर आणि सुलभ अटी आहेत. केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून याचा लाभ तळागाळातील बांधवांनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी महिला अध्यक्षा प्रभा मांगले यांनी मंगलाचरण म्हटले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर संस्थेचे शिष्यवृत्ती फंड प्रमुख अशोक साळवी व जिल्हाध्यक्ष सागर घोंगडे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार झाला. तद्नंतर स्व. अप्पासो अण्णाप्पा कासार बेनाडीकर सभागृहात उद्घाटन झाले.
संस्थेचे कार्याध्यक्ष महावीर दुरुगकर (सोलापूर) यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत प्रास्ताविक केले. प.पू. लक्ष्मीसेन महाराज कोल्हापूर मठ यांनी आदर्श संस्थेचे पंचसूत्री सांगून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व अध्यक्ष श्री. पोपटलाल डोर्ले यांचा कोल्हापूर भट्टारक पिठाच्या वतीने सन्मान केला.
संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले म्हणाले, अध्यक्ष विजयअण्णा कासार यांच्या प्रयत्नातून हे कार्यालय उभे राहिले आहे. आर्थिक योगदानात त्यांच्या कुटुबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेचे स्वमालकीच्या जागेत आज कार्यालय सुरू झाले आहे. जैन कासार संस्था केवळ नावाला नसून 'सेवा हाच धर्म' मानून अविरत कार्य करणारी एक जागृत संस्था आहे. संस्थेच्या कार्याची नोंद अखिल भारतीय पातळीवरील संस्थांनी घेतली आहे. हे कार्यालय केवळ एक वास्तू नसून आपल्या समाजाच्या प्रगतीचे आणि भविष्यातील स्वप्नांचे हक्काचे केंद्र आहे.
यावेळी कार्यालय उभारणीसाठी योगदान दिलेल्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ते सोलापूरच्या उपाध्यक्ष नीताताई मंकणी, हुकूमचंद हेसे, बाबुराव तंगा, परभणीचे विलास वानरे, अनंत विश्वंभर, हिंगोलीचे प्रशांत कंधारकर, अमरावतीचे संजय जैन, रत्नागिरीचे अशोक मोहिरे, अजित शिराळकर, प्रभा मांगले, इचलकरंजीचे सुकुमार पोते, पुणे येथील उदय लेंगडे, मोतीलाल वणकुद्रे, दीपक डोर्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर मांगले, नितीन मांगले आदींनी विशेष परिश्रम घेतले. विलास वानरे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या