सांगली प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामासाठी उर्वरीत निधीसह विविध प्रश्नी खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. त्यासाठी दोन स्वतंत्र निवेदने दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांना महाविकास आघाडीतील खासदारांनी भेटून त्यांच्या मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत विद्युत पुरवठा बंद होत असून त्यात बदल करावी, अशी मागणी पाटील यांनी दिलेल्या पहिल्या निवेदनात केली आहे. ग्रामीण भागात जलजीवन मिशनची कामे राज्य शासनाच्या निधीअभावी बंद आहेत. केंद्राने रक्कम दिली आहे. राज्यानेही पैसे देऊन कामे मार्गस्थ करावीत. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असून पीक विम्याचे निकष बदलून पीक विमा देण्यात यावा. कृष्णा कालवा मध्यम प्रकल्प दुरुस्तीकरण करण्यासाठी निधी द्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.
येथील वसंतदादा पाटील स्मारकाच्या उर्वरीत कामासाठी ८ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी करणारे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यात म्हटले आहे, की स्मारकाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सभागृह, दरवाजे, फोटो दालन, बाह्यरंग, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, सुशोभीकरण, फर्निचर, व्यासपीठ व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, शुद्ध पाणी या व्यवस्था अद्याप बाकी आहेत. त्यासाठी ८ कोटी २८ लाख रुपयांच्या अंदायपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून तांत्रिक मंजुरी घेतली आहे. शिवाय, २०१४ च्या प्रशासकीय मंजुरीतील २७ लाख ६१ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. व्याज रक्कम ७३ लाख ८४ हजार आहे. एकूण १ कोटी १ लाख रुपयांच्या या निधीसदेखील मान्यता द्यावी, अशी मागणी विशाल पाटील यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या