सांगली, दि. २५ (प्रतिनिधी) : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्ड क्र. १७ (सर्व्हे क्र. ७१/१, ७१/२, ७१/३) मधील नवनिर्मित भाजी मंडई इमारतीतील आतील व बाहेरील कट्ट्यांचे वाटप आज पारदर्शक लॉटरी पद्धतीने करण्यात आले. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली कै. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या सोहळ्यास स्थायी समितीचे सभापती अतुल माने, गटनेते मैनुद्दीन बागवान, सदस्य दिग्विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पराग कोडगुले, अधीक्षक प्रमोद रजपूत यांच्यासह मालमत्ता विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेकडो अर्जदारांच्या उपस्थितीत लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ घेऊन कट्ट्यांची निवड करण्यात आली. या अभिनव पद्धतीमुळे संपूर्ण प्रक्रिया निकोप व विनाअडथळा पार पडली.
कट्ट्यांची रचना व अर्जांची स्थिती
- आतील कट्टे : एकूण ६० कट्टे उपलब्ध असून ८७ अर्ज प्राप्त झाले. छाननीनंतर ८६ अर्ज पात्र ठरले. मासिक भाडे रु. १,०००/- निश्चित.
- बाहेरील कट्टे : एकूण १२७ कट्टे उपलब्ध असून १६ अर्ज प्राप्त झाले. छाननीनंतर १५ अर्ज पात्र ठरले. मासिक भाडे रु. ४००/- निश्चित.
नियम व अटी
कट्टा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना एक वर्षाचे आगाऊ भाडे तसेच करारपत्रापूर्वी रु. ५,०००/- अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे. कट्टा वाटपाबाबतचे सर्व अधिकार महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
या यशस्वी आयोजनाबद्दल शहरभरातून समाधान व्यक्त होत असून, पारदर्शक लॉटरी पद्धतीने झालेल्या वाटपामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या