सांगली प्रतिनिधी : मराठी पत्रकारितेतील निर्भीड, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ संपादक म्हणून लौकिक मिळविलेले दैनिक तरुण भारत संवादचे संपादक शिवराज (आण्णा) काटकर उद्या, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीतील विश्रामबाग येथील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये हा दिमाखदार पदग्रहण सोहळा होणार आहे.
या पदग्रहण सोहळ्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातून ५०० हून अधिक पत्रकार या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगलीत पत्रकारितेच्या नव्या पर्वाची नांदी...
रायगड येथे नियोजित पदग्रहण सोहळा रद्द झाल्यानंतर शिवराज काटकर यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदग्रहण समारंभ सांगलीत होत असल्याने पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची ८४ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली मातृसंस्था आहे. या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड ही त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या निर्भीड, तत्त्वनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पावती मानली जात आहे.
वार्ताहर म्हणून सुरू झालेला काटकर यांचा पत्रकारितेचा प्रवास संपादकपदापर्यंत आणि आता राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. सत्तेला प्रश्न विचारणे, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि सत्याशी तडजोड न करणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक ओळख राहिली आहे. ‘तरुण भारत’चे संपादक म्हणून त्यांनी वृत्तपत्राला आधुनिकतेची जोड देतानाच पत्रकारितेतील मूलभूत मूल्ये जपण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिवादन, शोभायात्रेने होणार कार्यक्रमाची सुरुवात...
उद्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर विश्रामबाग ते कृष्णा मॅरेज हॉल अशी पत्रकारांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सकाळी ९.३० वाजता पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन, तर सकाळी १० वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होणार आहे. त्यानंतर शिवराज काटकर यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुख्य पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर मंथन..
दुपारनंतर मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा तसेच सांगली जिल्ह्यातील संपादकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा होऊन पत्रकारितेसमोरील विविध प्रश्न व बदलत्या आव्हानांवर चर्चा होणार आहे. पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेतील सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्रांचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.
पत्रकार सुरक्षा, माध्यम स्वातंत्र्य, ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, फेक न्यूज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलत जाणारी पत्रकारिता अशा अनेक महत्त्वाच्या विषयांच्या पार्श्वभूमीवर शिवराज काटकर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून पत्रकारिता क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत.
राज्यभरातील पत्रकारांचा ऐतिहासिक सहभाग...
चार दशकांहून अधिक काळाच्या निर्भीड पत्रकारितेची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणारे शिवराज काटकर आणि त्यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून सांगलीत एकत्र येणारे ५०० हून अधिक पत्रकार, यामुळे सांगलीच्या भूमीत मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाचा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या