सांगली : डेरवण, चिपळूण येथे सुरू असलेल्या ४० व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बामणोली येथील श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे सांगलीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
२० वर्षे वयोगटात कु. सुयोग पंडित सोलंकर याने बांबू उडी (पोल व्हॉल्ट) या क्रीडा प्रकारात ३.७० मीटर उंच उडी मारत सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे २० वर्षे वयोगटातील कु. साहिल किरण सावळे याने ५ किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तर १८ वर्षे वयोगटातील कु. ऋतुजा रामचंद्र माने हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या तिन्ही गुणवंत खेळाडूंची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळाल्याने बामणोलीसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल सांगली जिल्हा ॲथलेटिक्स सचिव श्री. संजय पाटील सर, प्रशिक्षक परशराम (प्रशांत) बामणे, उद्योजक श्री. सतीश माळू तसेच सांगली जिल्हा टीम मॅनेजर श्री. प्रमोद सर यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात असून, त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सुयोग, साहिल आणि ऋतुजा यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे क्रीडाप्रेमींसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या