संग्रामपूर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या प्रचारार्थ १२ ऑगस्ट रोजी संग्रामपूर येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने संग्रामपूर परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
तिरंगा यात्रेची सुरुवात भारतमातेचे पूजन, राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’च्या गायनाने करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
या यात्रेत श्री संत गुलाब बाबा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाविद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी यांनीही यात्रेत सहभाग नोंदविला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, जिल्हा महामंत्री डॉ. गणेश दातीर, जिल्हा कोषाध्यक्ष लोकेशजी राठी, तालुका मंडळ अध्यक्ष भाऊराव पाटील अवचार, तालुका सरचिटणीस सुभाष हागे, प्रकाश गोतमारे, पवनजी अस्वार, मुरलीधर चोरे, शहराध्यक्ष राहुल शिरसोले, युवा मोर्चाचे गोपाल बंड, पांडुरंग इंगळे, राजनकर सर, जयराम इंगळे, राजेश मुयांडे, गुणवंत खोडके यांच्यासह महिला मोर्चाच्या अध्यक्षा उषाताई धुळे, लिलाताई चोपडे, शारदाताई बकालव तसेच तालुका व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा यात्रा म्हणजे केवळ राष्ट्रध्वज हातात घेऊन काढलेली मिरवणूक नसून देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे अभियान आहे. जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन सर्व भारतीयांनी एकत्र येऊन ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
रॅलीच्या समारोपप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी विद्यार्थी व नागरिकांना १५ ऑगस्टपर्यंत उत्साहाने आणि सन्मानपूर्वक प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. राष्ट्रध्वजाचा मान राखावा, फाटका किंवा खराब झालेला झेंडा वापरू नये, असेही त्यांनी सांगितले.
“तिरंगा यात्रा केवळ १५ ऑगस्टपुरती मर्यादित नसून, ती प्रत्येक नागरिकाला दररोज देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देणारी आहे,” असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानकर सर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या