सांगली : सांगली ग्रामीण पोलिसांनी गावठी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर कारवाई करत सुमारे ४०० लिटर गावठी हातभट्टी दारूचे कच्चे दारूचे रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट केले. या कारवाईत एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सांगली उपविभागातील माधवनगर परिसरात पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचालींची माहिती घेतली. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कर्नाळ गावच्या हद्दीत असलेल्या एस.सी. सीड्स अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यालगत गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जमिनीमध्ये लोखंडी बॅरल पुरलेले आढळले. त्यामध्ये गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन तसेच बाजूला लाकडे पेटविण्याची जागा दिसून आली. पोलिसांनी कारवाई करत २०० लिटर क्षमतेच्या दोन लोखंडी बॅरलमध्ये सुमारे ४०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारूचे रसायन आढळून आले. त्याची किंमत अंदाजे १६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय १ हजार ५०० रुपयांचे तीन लोखंडी बॅरल आणि २०० रुपयांचे लोखंडी डबे व इतर साहित्य असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
गावठी हातभट्टीचे दारूचे रसायन मानवी आरोग्यास अपायकारक व हानिकारक असल्याने ते नमुना काढून उर्वरित रसायन, रिकामे लोखंडी बॅरल, लोखंडी डबे आणि लोखंडी पारे आदी साहित्य पोलिसांनी नष्ट केले.
या प्रकरणी महाराज कुंभार मारवाडी आणि काल्या कुंभार मारवाडी, दोघेही कर्नाळ (ता. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील संबंधित कलमांनुसार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव भांडे तसेच पोलिस अंमलदारांनी केली.
जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या