प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद कार्यक्रमांतर्गत आभासी पध्दतीने युवक-युवतींना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्व अधोरेखित केले. देशभरातील 1500 हून अधिक ठिकाणी उपस्थित असलेल्या 10 लाखाहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यामध्ये सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि कस्तुरबाई वालचंद कॉलेज या महाविद्यालयांतील विद्यार्थी - विद्यार्थिनींचा समावेश होता.
‘अ’ श्रेणीमध्ये श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे आभासी पध्दतीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, माय युवा भारत सांगलीचे उपसंचालक राहुल डोंगरे, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष लताताई देशपांडे, उपाध्यक्ष स्मिताताई केळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एस. सुगते, उप प्राचार्या डॉ. नंदिनी काळे आदि उपस्थित होते. तर ‘ब’ श्रेणीमध्ये कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कुस्ती खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू पवन धायगुडे, व्हॉलिबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या जिल्हा क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या प्रज्ञा वरेकर यांची कॉलेजची विद्यार्थिनी शांभवी माळकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी व उपस्थित मान्यवरांनी त्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधला. तसेच उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
सांगतेवेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या