प्रतिष्ठा न्यूज/ सांगली प्रतिनिधी
सांगली : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स, सांगली येथे पदव्युत्तर विभागाच्या वतीने एम.ए. भाग १ चे नवागत विद्यार्थी व नवनियुक्त सहाय्यक प्राध्यापकांचे स्वागत तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमास लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा. श्री. सुहास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त सहाय्यक प्राध्यापक व एम.ए. भाग १ मधील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन केले. एम.ए.पर्यंतच शिक्षण मर्यादित न ठेवता पुढील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इंटरॅक्टिव्ह बोर्ड, संगणक तसेच अन्य शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र नेहमी जवळ बाळगावे आणि महाविद्यालयात शिस्तीचे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आर. व्ही. कुपवाडे यांनी पदव्युत्तर विभागाच्या अभ्यासक्रमाची तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. एन. चौगुले यांनी केले. कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पी. एन. गोरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. एस. एन. पाटील, प्रा. अनिता शेंडगे आणि कु. श्रावणी चरणकर यांनी केले.
महाविद्यालयातील कु. मुक्ता लिमये, कु. स्वरा जोशी, कु. श्रुती कोरे व सौ. श्रीदेवी शिवशरण यांनी स्वागतगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या