प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : विजयपूर शहरातील आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूतनाळ तलावात आईसह तिच्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची ओळख तोरवी शांतिनगर येथील शोभा जालगेरी (वय 35) तसेच त्यांच्या मुली विद्या (वय 15), सुवर्णा (वय 13), सानिका (वय 10) आणि मुले तिप्पराय (वय 12), विकास (वय 6) अशी झाली आहे.
24 ऑगस्ट रोजी शोभा आणि तिची मुले बेपत्ता झाल्याची तक्रार विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी बेपत्ता प्रकरण क्रमांक 395/2026 नोंदविण्यात आले होते. शोभा यांचे पती मल्लिकार्जुन जालगेरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक विषयावरून समज दिल्यानंतर शोभा मुलांना घेऊन घरातून निघून गेल्या होत्या.
दरम्यान, शोभा आणि त्यांच्या पाचही मुलांचे मृतदेह भूतनाळ तलावात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह तलावातून बाहेर काढून बीएलडीई रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.
या घटनेमागील नेमके कारण काय, याचा आदर्शनगर पोलीस तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या