प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) अक्षम्य कार्यालयीन चुकीमुळे आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे सांगशी (ता. गगणबावडा) येथील शेतकरी तुकाराम हैबतराव पडवळ यांना तब्बल ८७,३५० रुपयांच्या अवाजवी वीज बिलाचा फटका बसला आहे. स्वतःची कोणतीही चूक नसताना आर्थिक अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्याने आता आरपारची लढाई छेडली असून, येत्या १५ दिवसांत बिलाची दुरुस्ती करून 'बळीराजा योजना २०२४' चा लाभ न दिल्यास महावितरण गगणबावडा कार्यालयासमोर प्राणांतिक (आमरण) उपोषण करण्याचा कडक इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कार्यालयीन चुकीचा शेतकऱ्याला फटकामिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम पडवळ यांच्या गट नं. २८ मधील शेती पंपासाठी २३ जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्ष ५ HP क्षमतेची मोटार बसवलेली असून तीच वापरली जात आहे. मात्र, महावितरणच्या गगणबावडा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे कागदपत्रांवर आणि वीज बिलावर ५ HP ऐवजी चुकीची ८ HP अशी नोंद करण्यात आली होती. ही चूक नंतर महावितरणने मान्य करून कागदपत्रांवर ५ HP अशी दुरुस्तीही केली.
परंतु, या प्रशासकीय घोळामुळे शासनाच्या 'बळीराजा योजना २०२४' अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीपासून शेतकरी पडवळ यांना वंचित राहावे लागले.
८७ हजार ३५० रुपयांच्या बिलाचा शॉक
योग्य वेळात योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे आणि चुकीच्या नोंदीमुळे थकबाकी वाढत जाऊन शेतकरी तुकाराम पडवळ यांना थेट ८७,३५० रुपये इतके प्रचंड बिल पाठवण्यात आले आहे. ही अवाजवी रक्कम पाहून शेतकऱ्याचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात त्यांनी २१ मे २०२६ रोजी गगणबावडा महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना रीतसर अर्ज देऊन सर्व परिस्थितीची कल्पना दिली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही अधिकाऱ्यांनी या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही.
महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
महावितरणच्या या उदासीन कारभाराला कंटाळून शेतकरी पडवळ यांनी आता प्रशासनाला अंतिम इशारा (अल्टीमेटम) दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, "माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ५ HP च्या प्रत्यक्ष वापराच्या आधारे मला 'बळीराजा योजना २०२४' चा लाभ मंजूर करण्यात यावा आणि ८७,३५० रुपयांच्या बिलाची योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी. येत्या १५ दिवसांत जर प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर मला नाईलाजाने महावितरण गगणबावडा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल. या काळात माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील."
शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने सांगशी आणि परिसर परिसरातील शेतकऱ्यांमधून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या