प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील अष्टेकर मळा,म्हेत्रे मळा,दरेकर मळा तसेच इंदिरानगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या आणि विविध मळेभागांना जोडणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असून दुचाकीस्वार, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. मळेभागातील नागरिकांना शहराशी जोडणारे हे प्रमुख मार्ग असूनही त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.रस्ते डांबरीकरण किंवा मोठ्या कामाची मागणी नसून, तातडीने मुरूम टाकून रस्ते वाहतुकीयोग्य करण्याची गरज आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून संबंधित रस्त्यांवर मुरूम टाकावा, अशी मागणी जोर धरत आहे.प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या