सांगली, दि. १ : धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंच, सांगली यांच्या वतीने थोर साहित्यिक, साहित्यरत्न आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. सामाजिक समता, मानवता आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे उपाध्यक्ष निलेश पवार आणि नितीन कांबळे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा धम्मचक्र युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ आठवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी, शाहिरी आणि साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून सामाजिक समतेच्या लढ्यात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील."
कार्यक्रमास अरविंद कांबळे, मिलिंद कदम यांच्यासह धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण होते. शेवटी उपस्थितांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि समतेचा संदेश समाजात रुजविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या