सांगली : मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत नाट्यकलेचा संस्कार समाजमनात अधिक व्यापकपणे रुजविण्याचा निर्धार व्यक्त करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा १२१ वा वर्धापन दिन सांगली शाखेतर्फे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. सुरवातीला सांगली शाखेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी यांनी स्वागत-प्रास्ताविकातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची भूमिका आणि आगामी काळातील नाट्यचळवळीची दिशा यावर भाष्य केले. शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी सांगली शाखेच्या विविध उपक्रमांची, नाट्यविषयक कार्यक्रमांची आणि भविष्यातील नियोजित उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सांगली शाखेच्या आतापर्यंतच्या कार्याचा तसेच आगामी उपक्रमांचा सविस्तर आढावा प्रशांत दामले यांच्यासमोर मांडण्यात आला. शाखेच्या कार्यपद्धतीचे आणि नाट्यचळवळीला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे प्रशांत दामले यांनी समाधान व्यक्त करत सांगली शाखेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमीचा इतिहास हा केवळ नाटकांचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तनाचा इतिहास आहे. या परंपरेला समकालीन संदर्भांची जोड देत नव्या पिढीपर्यंत नाट्यसंस्कृती पोहोचविणे, हा नाट्य परिषदेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे यावेळी दामले यांनी अधोरेखित केले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार सांगली शाखेचे संचालक कुलदीप देवकुळे मानले. यावेळी उपस्थित नाट्यकर्मी, रंगकर्मी आणि पदाधिकाऱ्यांनी नाट्य परिषदेच्या प्रदीर्घ वाटचालीला शुभेच्छा देत मराठी रंगभूमीची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन, नियामक मंडळ सदस्य आणी नाट्य वितरक श्री गिरीश महाजन, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, यांच्यासह नाट्य परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, उपाध्यक्ष सौ. अंजली भिडे, प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच संचालक प्रशांत गोखले, कुलदीप देवकुळे, मकरंद कुलकर्णी, शशांक लिमये आणि अनिरुद्ध जेरे उपस्थित होते.
१२१ वर्षांची परंपरा, बदलत्या काळाची आव्हाने आणि नव्या पिढीच्या अपेक्षा यांचा समन्वय साधत मराठी रंगभूमीची चळवळ अधिक सक्षम करण्याचा संदेश या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगलीतून देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या