प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : चटपटीत खाद्य पदार्थांसाठी मुलांचा हट्ट आणि त्यांच्या हट्टापुढे हात टेकणारे पालक... याचाच गैरफायदा घेत शहर आणि परिसरातील काही बेकरी,टपरीधारक व खाद्यपदार्थ विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा असून, या प्रकाराला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.हल्ली चटपटीत आणि तयार खाद्यपदार्थ खाण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.गेल्या दशकभरात शहरातील गल्ली-बोळांमध्ये बेकरी,स्नॅक्स सेंटर,खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि लहान-मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.मात्र,या ठिकाणी विक्री होणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची मुदत,साठवणूक, स्वच्छता आणि गुणवत्तेची तपासणी होते का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.काही ठिकाणी केक,खारी,ब्रेड,फरसाण यांसारखे पदार्थ मुदत संपल्यानंतरही विक्रीसाठी ठेवले जात असल्याचे, तसेच काही पदार्थांचे लेबल बदलून किंवा नवीन लेबल लावून विक्री केली जात असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. मुदतबाह्य पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार आणि अन्य आरोग्य विषयक त्रास वाढण्याची शक्यता असताना या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सणासुदीलाच प्रशासनाला जाग?
सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे.अधिकारी खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात.नमुने दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाते. मात्र,ही कारवाई केवळ सण-उत्सवांच्या काळापुरतीच मर्यादित राहते का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.शहरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर नियमित तपासणी होत नसेल,तर मुदतबाह्य पदार्थ विक्री करणाऱ्यांचे फावणारच.एखादी जुजबी कारवाई करून प्रशासनाने कर्तव्यपूर्तीचा आव आणण्याऐवजी नियमित तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
*पदार्थांबरोबर निर्मितीस्थळांचीही तपासणी करा*
केवळ दुकानातील तयार खाद्यपदार्थ तपासून प्रश्न सुटणार नाही.ज्या ठिकाणी केक,ब्रेड, फरसाण, खारी व अन्य पदार्थ तयार केले जातात, त्या ठिकाणची स्वच्छता,पाणी,कच्चा माल, साठवणूक व्यवस्था आणि कामगारांची स्वच्छता यांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. अस्वच्छ वातावरणात तयार होणारे पदार्थ थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.विशेषतः लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत पालकांनीही खरेदीपूर्वी मुदत, पॅकिंग आणि पदार्थाची स्थिती तपासण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, ग्राहकांच्या जागरूकतेसोबतच नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा पदार्थांची विक्री तातडीने थांबवावी, तसेच शहर व परिसरातील बेकरी, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ निर्मिती केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या