प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज दि.27 : सावळज (ता. तासगाव) येथे डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाच्या मुद्द्यावरून तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक आमने-सामने आले आहेत. डॉल्बीमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात ज्येष्ठ नागरिक संघटना व ग्रामस्थांनी आता एल्गार पुकारला असून, डॉल्बी बंदीसाठी ते थेट मैदानात उतरले आहेत.
या प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे.
दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत डॉल्बी बंदीबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत, ग्रामपंचायतीचे पत्र आणि शेकडो ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे.
सध्या वाजवल्या जाणाऱ्या डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री होणाऱ्या आवाजामुळे झोपमोड होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापुरुष जयंती, गणेशोत्सव, लग्न समारंभ व इतर विविध उत्सवांमध्ये डॉल्बीचा मुक्त वापर सुरू आहे. शासनाने डॉल्बी बंदीचे आदेश देऊनही अनेक मिरवणुकांमध्ये नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवला जात आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसून, पोलिसांचे असहकार्य लाभत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नियमभंग करणाऱ्या डॉल्बीचालकांवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आलीआहे.
डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घालावी, डेसिबलची मर्यादा निश्चित करावी आणि रात्री 10 नंतर डॉल्बी वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालून वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघटना व ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप चिवटे, सचिव राजू कलाल, उपाध्यक्ष अशोक कोरे, दिलीप उनउणे, बापूसाहेब देसाई, अनिल शिंदे,श्रीकांत शिंदे,युवराज कोरे, विठोबा कोरे, प्रतिभा पोळ, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या