नागपूर : NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि रोजगाराच्या प्रश्नावर सोमवारी (20 जुलै) नागपूर येथील संविधान चौकात विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार आंदोलन केले. "आम्ही सारे भारतीय" या बॅनरखाली पोलिसांची परवानगी घेऊन हे आंदोलन पार पडले.
आंदोलनकर्त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राखावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या घटकांवर कठोर शिक्षा करावी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
संविधान चौकात दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांनी हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असल्याचे सांगितले. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या अपेक्षित सहभागाबाबतही नाराजी व्यक्त केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेला हा लढा पुढेही सुरू राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या