प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दवाखान्यांमध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेल्या हल्ल्यांविरोधात तासगाव शहर व तालुक्यातील संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र एकवटले असून, सोमवारी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाला इशारा देण्यात आला.डॉक्टरांवरील वाढत्या गुंडगिरीला आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. यापुढे सर्व डॉक्टर संघटितपणे अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देतील, असा स्पष्ट आणि ठाम इशारा यावेळी देण्यात आला.डोंबिवली येथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत तासगावातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल कर्मचारी, मेडिकल स्टोअर्स कर्मचारी आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतला. तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देत डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीव वाचविण्याचे काम करणाऱ्या डॉक्टरांनाच मारहाण, धमक्या आणि गुंडगिरीला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनाचा आदर राखत २० जुलै रोजी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी लाक्षणिक संप तात्पुरता स्थगित करण्यात आला असला,तरी डॉक्टरांच्या सुरक्षितते संदर्भातील मागण्या शासनाने तातडीने मान्य करून ठोस आणि प्रभावी कार्यवाही केली नाही, तर ९ ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा डॉक्टर संघटनांनी दिला.गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करून डॉक्टर,नर्सिंग स्टाफ आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व तासगाव निमा अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर, सचिव डॉ. संतोष पाटील, उपाध्यक्षा डॉ. स्वाती पाटील, होमिओपॅथी संघटनेचे डॉ. रोहित सूर्यवंशी, डॉ. शेळके आणि डॉ. ज्योती पाटील यांनी केले.
यावेळी डॉ. मिलिंद जाधव, सचिन साबळे, संजय देवकुळे, विवेक गुरव, शब्बीर मुलानी, पवनकुमार शिरोटे, तोफिक मुजावर, प्रसाद देशपांडे, प्रशांत पाटील, विनयकुमार परदेशी, रुपेश पाटील, आशिष पाटील, संदीप चव्हाण, अमोल सोनटक्के, अण्णासाहेब पाटील, रेखा पाटील, मनीषा शिंदे, आरती पाटील, शरीक मुल्ला, वैभव बरबुले, साहिल जमदाडे, प्रशांत गुरव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या