प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात एसटी बसस्थानके, आगार, कार्यालये व विविध परिसरात राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विद्या विहार येथील विभागीय कार्यालयात करण्यात आला.
यावेळी आमदार दिलीप लांडे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. ती प्राणवायू पुरवतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. त्यामुळे एक झाड लावणे म्हणजे भविष्यातील अनेक संकटांवर उपाय उभा करणे होय."
ते पुढे म्हणाले की, वाढते जागतिक तापमान, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ हे केवळ प्रवासी सेवा देणारे परिवहन माध्यम नसून समाजाशी नाळ जोडलेली सामाजिक संस्था असल्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे हीदेखील त्याची सामाजिक बांधिलकी आहे.
यावेळी "एक कर्मचारी - एक वृक्ष" आणि "एक नागरिक - एक वृक्ष" हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले. केवळ वृक्षारोपण करून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येक रोपाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व एसटी आगार, बसस्थानके आणि कार्यालय परिसरात हिरवाई वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या