प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. ४: संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असणे ही अभिमानाची बाब आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर इतरांशी नव्हे, तर स्वतःशी स्पर्धा करा. शिस्त, संघर्ष, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम आणि सर्वांचा आदर ही मूल्ये आत्मसात केल्यास उज्ज्वल भविष्य निश्चित घडते. शिक्षकांचे मार्गदर्शन स्वीकारून प्रामाणिक प्रयत्न करणारे विद्यार्थीच खऱ्या अर्थाने समाजाचे सक्षम नेतृत्व करतात. संयोगिता केंब्रिज स्कूल मध्ये असे विद्यार्थी घडत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सां. मि. कु. महानगरपालिकेच्या जिल्हा क्रिडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे यांनी शाळेने आयोजित केलेल्या विद्यार्थी पदग्रहण समारंभात केले.गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राजक्ता वीरेंद्र पाटील उपस्थित होत्या.
प्रारंभी सहकार तपस्वी व माजी खासदार गुलाबराव पाटील आणि स्कुलच्या संस्थापिका संयोगिता पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करुन, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य विद्यार्थी, उपमुख्य विद्यार्थी तसेच विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेत शाळेच्या शिस्तीचे, जबाबदारीचे आणि सेवाभावाचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प केला.
अध्यक्षीय भाषणात प्राजक्ता वीरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळविणे नव्हे, तर जबाबदारी स्वीकारून आदर्श कृतीतून इतरांसमोर उदाहरण निर्माण करणे होय. शिस्त, प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो. शिक्षणाबरोबरच क्रीडा, संस्कार आणि चारित्र्य यांनाही तितकेच महत्त्व देऊन आई-वडिलांचे, शाळेचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे." त्यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थी मंत्रिमंडळ शाळेतील शिस्त, गुणवत्ता आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, ख्रिस्टीना मॅडम, साहेबलाल शरीकमसलत, विलास शेवाळे, सर्व समन्वयिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदग्रहण सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त ॲड. वीरेंद्रसिंह पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ. सतीश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आराध्या पवार, दिव्यांका कोळेकर, सोनाक्षी देसाई आणि ख्याती पटेल या विद्यार्थिनींनी केले, तर समीक्षा दबडे हिने आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन क्रीडा शिक्षक दीपक शेलार, जयश्री बिरंगे आणि सोमनाथ बलगुडे यांनी केले. उत्साह, प्रेरणा, शिस्त आणि नेतृत्वाची नवी जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा हा पदग्रहण सोहळा सर्व उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या