प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी '३०० कोटी वृक्षारोपण अभियान (सन २०२६-२७)' अंतर्गत तासगाव नगरपरिषदेने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत शहरात व्यापक वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ केला आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वृक्षलागवड समितीचे अध्यक्ष डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या 'हरित सांगली' अभियानाचा भाग म्हणून शनिवारी तासगाव शहरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.या मोहिमेअंतर्गत शहरात मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल विकसित करून तब्बल ३५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.शनिवारी सकाळी १० वाजता गणेश कॉलनी परिसरातून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी नगराध्यक्ष सौ विजया पाटील, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे,सर्व नगरसेवक,नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ पाटील म्हणाल्या की,वाढते शहरीकरण,औद्योगिकीकरण आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे.अशा परिस्थितीत वृक्षारोपण ही केवळ औपचारिक मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी आणि हरित पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षांमुळे शुद्ध प्राणवायू, सावली, भूजल पातळीत वाढ, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्जन्यमान टिकवून ठेवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी सांगितले की, राष्ट्रीय वन धोरण १९८८ नुसार देशाच्या किमान ३३ टक्के क्षेत्रावर वनसंपदा असणे आवश्यक आहे. मात्र सध्या हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने हवामान बदलाचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणा सोबतच वृक्षसंवर्धनही तितकेच आवश्यक आहे. तासगाव नगरपरिषद शहरातील विविध मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्यासाठी विशेष नियोजन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे, या अभियानांतर्गत 'मियावाकी' पद्धतीने जंगल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या पद्धतीत कमी जागेत दाट स्वरूपात देशी प्रजातींची झाडे लावली जातात.त्यामुळे झाडांची वाढ जलद होते, जैवविविधता वाढते, तापमानात घट होण्यास मदत मिळते आणि परिसर अधिक हिरवागार बनतो. तासगावात उभारण्यात येणारे हे मियावाकी जंगल शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्रात वाढ होणार असून, प्रदूषण कमी करण्यास, उष्णतेची तीव्रता घटविण्यास आणि नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास 'हरित तासगाव'चे स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या