मुंबई, प्रतिनिधी : मानखुर्द चाइल्ड सेफ्टी फोरमच्या वतीने प्रभागस्तरीय बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शरद कुर्हाडे यांची भेट घेऊन फोरमतर्फे औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत बाल संरक्षण समिती स्थापनेच्या प्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी श्री. कुर्हाडे यांनी या संदर्भात जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांना आवश्यक सूचना व निर्देश देऊन समिती स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम, समन्वित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने मानखुर्द चाइल्ड सेफ्टी फोरमचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी युवा संस्था, जीवनधारा, सपोर्ट, थिंक न्यू फाउंडेशन आणि बाल अधिकार संघर्ष संघटना या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युवा संस्थेचे बाल अधिकार कार्यकर्ते प्रकाश भवरे म्हणाले, "मुलांच्या सुरक्षिततेचे, संरक्षणाचे आणि हक्कांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधि (नगरसेवक), मुलं, पोलीस, शाळा, ICDS सुपरवायझर,आणि संस्था यांच्या समन्वयातून कार्यरत असलेली समिती बाल संरक्षण, बालविवाह, बालमजुरी तसेच मुलांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करू शकते. यामुळे प्रत्येक मुलासाठी सुरक्षित, संरक्षणात्मक आणि बालस्नेही वातावरण निर्माण करण्यास मोठी मदत होईल."
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या