प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 10 : खरीप हंगाम 2025-26 साठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या 11 पिकासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेसाठी मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकासाठी 31 ऑगस्ट 2026 आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तूण धान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोणातून खरीप हंगाम २०२३ पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2026-27 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात,ज्वारी, बाजरी,मका, नाचणी, तूर,मूग,उडीद,सोयाबीन,भुईमूग व सूर्यफूल या 11 पिकासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पात्रता निकष
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर संबंधित पिकांच्या बाबतीत किमान 40 (0.40 हे.) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. (भात या पिकासाठी 0.20 हे. आवश्यक)
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा,
जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील पोषित केलेल्या चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते धनादेश, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाळी प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रकम रु. 300 राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहील.
बक्षिस स्वरूप
तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार रूपये, दुसरे 3 हजार रूपये व तिसरे 2 हजार रूपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रूपये, दुसरे 7 हजार रूपये व तिसरे 5 हजार रूपये. राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रूपये, दुसरे 40 हजार रूपये व तिसरे 30 हजार रूपये बक्षीस आहे.
पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या