प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, प्रभावी आणि समावेशक शिक्षण मिळावे,यासाठी विशेष शिक्षक व मानसोपचार तज्ज्ञांचे कौशल्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने तासगाव येथे राज्यस्तरीय तीन दिवसीय सीआरई (Continuing Rehabilitation Education) प्रशिक्षणास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे.भारतीय पुनर्वास परिषद (आरसीआय), नवी दिल्ली आणि आधार शिक्षण संस्था संचलित कै. सौ. शकुंतला राजमाने विशेष अध्यापक विद्यालय, तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील ५० विशेष शिक्षक व मानसोपचार तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.'विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेशक शिक्षण अध्यापन पद्धती' या विषयावर आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण दिव्यांग क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय पुनर्वास परिषदेकडे नोंदणीकृत विशेष शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञांना बदलत्या शैक्षणिक पद्धती, आधुनिक अध्यापन तंत्र, मुलांचे मानसशास्त्र आणि समावेशक शिक्षणाच्या प्रभावी संकल्पनांची माहिती या प्रशिक्षणातून दिली जात आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन आधार शिक्षण संस्थेचे सचिव संजय राजमाने यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विशेष शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी डी.एड.स्पेशल एज्युकेशन तासगावच्या कोर्स कोऑर्डिनेटर सौ.पूनम विलास माने,पंचायत समिती कडेगावचे विशेष शिक्षक राहुल शिवाजीराव वीर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ अजित हरिराम पाटील,कोल्हापूरच्या मानसोपचार तज्ज्ञ अमृता वासुदेव पाटील आणि जिल्हा समन्वयक राहुल राजे रामचंद्र राजे कुंभार यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी मानसशास्त्रज्ञ सीमा मानसिंग यादव (कागल), मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूटचे प्रा.जगन मुदगडे, मानसशास्त्रज्ञ अभिजीत किशोर आंबेकर आणि साधना मतिमंद मुलांची विद्यालयाचे मानसशास्त्रज्ञ बाळासो नानासो चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.तिसऱ्या दिवशी संतोष हंसराज गायकवाड, दशरथ विलास सावंत, उषा गणपती सातपुते आणि रुपाली अनिलकुमार राजमाने हे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत.
प्रशिक्षणासाठी सहभागी सर्व तज्ज्ञांच्या चहा-नाश्ता, भोजन व निवासाची व्यवस्था आधार शिक्षण संस्थेमार्फत करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून अनिलकुमार राजमाने आणि बाळासाहेब चव्हाण काम पाहत आहेत.या राज्यस्तरीय उपक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे तसेच सहाय्यक सल्लागार मंजिरी माने-जाधव (दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, सांगली) यांचे सहकार्य लाभले असून, प्रशिक्षणासाठी आधार शिक्षण संस्थेचे सचिव संजय राजमाने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि समावेशक शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने तासगावमध्ये आयोजित हे राज्यस्तरीय प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या