प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या मागणीसाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी मुंबईतील विधानभवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी प्रस्तावातील प्रशासकीय आणि भौगोलिक बाबी मांडण्यात आल्या असून, त्यावर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.सध्या मिरज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मिरज,तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांचा कार्यभार आहे. अर्धन्यायिक महसुली प्रकरणे, जातीचे दाखले,अपील प्रकरणे तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे मिरज प्रांत कार्यालयावर मोठा ताण निर्माण झाला आहे.परिणामी तासगाव आणि कवठे महांकाळ मधील नागरिकांना महसुली सेवा मिळण्यासाठी वारंवार मिरजला जावे लागत असून मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.आमदार रोहित पाटील यांनी बैठकीत दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची गैरसोय, मिरजपर्यंतचे लांब अंतर आणि वाढता प्रशासकीय ताण याकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच तासगाव व कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांकडून आवश्यक 'ना हरकत' पत्रे प्राप्त झाल्याची माहितीही दिली. त्यामुळे प्रस्तावाच्या प्राथमिक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव पुढे नेण्याचे आश्वासन दिले.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील लाखो नागरिकांची महसुली कामांसाठीची धावपळ कमी होईल, विविध प्रकरणांचा निपटारा जलद होईल आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या