सांगली, दि. 7 जुलै : लोककल्प फाऊंडेशनच्या वतीने सांगली मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचारीवर्गासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 100 लाभार्थींनी आरोग्य तपासणी व आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
शिबिरानंतर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रादेशिक व्यवस्थापक सुदत्त पाठक यांनी उपस्थितांना लोककल्प फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी नियमित आरोग्य तपासणी, आरोग्याची योग्य काळजी आणि जनजागृतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
यानंतर उषःकाल हॉस्पिटल, सांगली येथील डीएमओ डॉ. स्नेहल पाटील यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, संतुलित आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक सवयी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित कर्मचारीवर्गाने लाभ घेतला.
या कार्यक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सुदत्त पाठक, सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक बळवंत भालकर, क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक सुभाष मोरे, प्रादेशिक मार्केटिंग व्यवस्थापक सूरज पाटील, सीएसआर सहाय्यक वैभव दाभाडे तसेच मार्केटिंग सहाय्यक अर्जुन देवकर उपस्थित होते.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशनमार्फत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या कार्याचे समाजातून मोठ्या प्रमाणावर स्वागत व कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या