प्रतिष्ठा न्युज/अक्षय कोठावळे
हातकणंगले : मजले–बसवान खिंड मुख्य रस्त्यालगत असलेली उघडी विहीर सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून या विहिरीभोवती तातडीने संरक्षण कठडा उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रस्त्यालगत असलेल्या या विहिरीला कोणत्याही प्रकारचा मजबूत कठडा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र विहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडी-झुडपे वाढल्याने विहीर सहज नजरेस पडत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, रस्त्याच्या अगदी लगत असलेल्या या विहिरीभोवती संरक्षण कठडा नसल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. तसेच पादचारी व जनावरांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन विहिरीभोवती मजबूत संरक्षण कठडा उभारावा, झाडी-झुडपे हटवावीत व इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या