सांगली, प्रतिनिधी : सांगली शिक्षण संस्था संचलित डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर, सांगली येथे शनिवार (दि. 11 जुलै 2026) रोजी पर्यावरण जनजागृतीच्या उद्देशाने वृक्षदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली.
यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी विविध प्रकारची रोपे आणून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारे आकर्षक घोषणा फलक तयार करून आणले होते.
पालखी, ढोल, झांज आणि ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात वृक्षदिंडी काढली. "झाडे लावा, झाडे जगवा", "लावू वने, पिकवू सोने", "एक मूल, एक झाड" अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या उपक्रमात सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.
या प्रसंगी सकाळ व दुपार सत्राचे पर्यवेक्षक महेश सपकाळ व गिरीश जोशी यांच्यासह दोन्ही सत्रांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.
शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली असून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या