भाईंदर/रोहतक प्रतिनिधी : हरियाणातील रोहतक येथे १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान सुरू असलेल्या सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील पैलवान विशाल जाधव याने ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विशालने हिमाचल प्रदेशच्या अर्पितविरुद्ध दमदार खेळ करत १२-२ अशा तांत्रिक गुणफरकाने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत उत्तर प्रदेशच्या बलाढ्य आकाश भाटीविरुद्ध झालेल्या लढतीत त्याला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आकाश भाटी अंतिम फेरीत पोहोचल्याने विशालला रिपेचेज फेरीतून पुन्हा संधी मिळाली.
रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात कर्नाटकच्या नागार्जुनच्या गैरहजेरीमुळे विशालला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या निर्णायक सामन्यात पंजाबच्या कर्णवीरवर १०-० अशा तांत्रिक गुणफरकाने शानदार विजय मिळवत विशालने राष्ट्रीय स्पर्धेतील कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
अभिनव कॉलेज, भाईंदर येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विशालसाठी हे पहिलेच राष्ट्रीय स्तरावरील पदक ठरले आहे. सध्या तो पुणे येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात नियमित सराव करत असून, त्याच्या या यशामागे कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे.
विशालच्या या यशाबद्दल श्री गणेश आखाड्याचे पदाधिकारी, वस्ताद, प्रशिक्षक, सहकारी पैलवान तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या