प्रतिष्ठा न्यूज
महाबळेश्वर प्रतिनिधी : प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ९ जुलै रोजी विधानसभेत जाहीर केला असून, त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे आणि किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या सदस्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरणाच्या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या थडग्याजवळ शिवप्रतापाचे दर्शन घडवणारे, अफजलखानाचा वध दर्शविणारे शिल्प उभारण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याने छत्रपती शिवाजी महाराजांवर उगारलेला हात हवेतच छाटून महाराजांचे प्राण वाचविणाऱ्या पराक्रमी मावळा वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचे जिवंत दर्शन घडवणारे स्मारक उभारण्यात यावे. तसेच त्या स्मारकावर संबंधित ऐतिहासिक माहितीही प्रदर्शित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, भूषण गुरव, किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य विजय नायडू, अमोल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या