प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि तब्बल १३ वर्षांपासून विविध प्रशासकीय कारणांमुळे रखडलेला तासगाव बायपास रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. शासनाकडून भूसंपादनासाठी ₹१०,९६,४२,८०५ (दहा कोटी शहाण्णव लाख बेचाळीस हजार आठशे पाच रुपये) निधी उपलब्ध झाल्यानंतर माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना भरपाईच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भूसंपादन प्रक्रियेमुळे संबंधित शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने निधी मंजूर केल्यानंतर धनादेशांचे वाटप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.तासगाव शहरातील वाढती वाहतूक,सतत होणारी कोंडी आणि अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता बायपास रस्ता हा शहरासाठी अत्यंत गरजेचा प्रकल्प मानला जात होता.मात्र भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने या प्रकल्पाच्या कामाला गेली १३ वर्षे अडथळे येत होते.हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी महसूल विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन निधी मंजूर करणे,भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.तसेच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा व्हावी,यासाठीही त्यांनी पाठपुरावा केला होता.या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने आता तासगाव बायपास रस्त्याच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बायपास पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून,जड वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळवता येणार आहे.त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित,जलद आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तसेच बायपास प्रकल्पामुळे तासगाव शहरातील व्यापार,उद्योग,गुंतवणूक आणि नियोजनबद्ध नागरी विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.तब्बल १३ वर्षांपासून रखडलेला हा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघाल्याने तासगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या