सांगली प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने स्वरार्पण प्रस्तुत 'जाता पंढरीसी' या अभंग रचनांच्या सांगीतिक मैफिलीचे आयोजन शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी ४.०० वाजता विष्णूदास भावे नाट्य विद्यामंदिर, सांगली येथे हा भक्तिरसाने नटलेला कार्यक्रम रंगणार असून सांगलीकर रसिकांना सुरेल आणि श्रवणीय अभंगांचा अनोखा संगीतानुभव घेता येणार आहे. अशी माहिती गायक प्रल्हाद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मैफिलीमध्ये झी मराठीवरील 'सारेगमप' आणि 'सूर नवा ध्यास नवा' या लोकप्रिय कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेले गायक प्रल्हाद जाधव आपल्या स्वरांनी अभंगांची भक्तिमय उधळण करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रभावी निरूपण प्रा. निशांत गोंधळी करणार आहेत.
संगीताला दर्जेदार साथसंगत लाभणार असून शिवाजी सुतार (हार्मोनियम), केदार गुळवणी (व्हायोलिन), संदेश खेडेकर (तबला), राम चौधरी (पखवाज) आणि गुरु ढोले (साईड रिदम) हे वादक सहभागी होणार आहेत. तसेच शर्वरी कुलकर्णी, शुभ्रा खाडे, गौरी शिंदे, वसिम मुजावर आणि सूरज कांबळे हे समूहस्वर सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रुती तवटे यांनी केले असून ध्वनी संयोजनाची जबाबदारी सव्वाशे साऊंड यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
स्वरार्पण संस्थेने यापूर्वी 'सूरमयी शाम', 'आम्हां नादी विठ्ठलु', 'पुछो ना कैसे मैने रैन बिताई', 'आधी रचिली पंढरी' आणि 'सुरूर-ए-इश्क' यांसारखे विविध सांगीतिक उपक्रम यशस्वीपणे सादर केले आहेत. त्याच परंपरेत आता 'जाता पंढरीसी' या भक्तिरसाने ओतप्रोत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून, या संगीतमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सांगलीकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरार्पणच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या