नृसिंहवाडी (ता. शिरोळ) : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, मंगळवारी पहाटे सुमारे 3.30 वाजता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि तीर्थस्नानासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...' या अखंड जयघोषात श्री दत्तगुरूंच्या पादुकांवरून कृष्णा नदीचे पाणी प्रवाहित झाले आणि वर्षातील पहिल्या दक्षिणद्वार सोहळ्याचा अविस्मरणीय क्षण भक्तांनी अनुभवला. दत्त संप्रदायात कृष्णामाईने श्रींच्या पादुकांना स्पर्श करण्याचा हा प्रसंग अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. पावसाळ्यातच लाभणाऱ्या या दुर्मिळ पर्वणीसाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या श्रद्धेने नृसिंहवाडीत दाखल झाले होते.
कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दत्त मंदिर परिसरात पाणी पोहोचल्याने देवस्थान प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत मंदिरातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच धरण क्षेत्र आणि परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा वेढा पडल्याने श्रींची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मठात विधिवत हलविण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था तेथे करण्यात आली असून, श्रींच्या सर्व नित्य पूजा व धार्मिक विधी नारायण स्वामी मठात नियमितपणे सुरू राहतील, अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष प्रा. गुंडो पुजारी यांनी दिली.
दक्षिणद्वार सोहळ्यामुळे नृसिंहवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, कृष्णामाई आणि श्री दत्तगुरूंच्या पावन मिलनाचा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी कायम आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या