प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने सन २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिर, सांगली येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळविल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.
या यशानिमित्त शाळेत गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन राहुल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद मसुटगे, सौ. सुनिता उपाध्याय तसेच मुख्याध्यापक शांतीनाथ चौगुले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चि. स्वरूप चौगुले आणि कु. आदिती अवताडे यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगत इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
जिल्हा गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी :
चि. स्वरूप सचिन चौगुले – शहरी सर्वसाधारण, क्रमांक K-15/179, गुण २५६/३००
चि. विराज शहाजी लांडगे – शहरी सर्वसाधारण, क्रमांक K-73/179, गुण २२८/३००
कु. आदिती अंबादास अवताडे – शहरी सर्वसाधारण, क्रमांक K-77/179, गुण २२८/३००
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. राजश्री खवाटे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी वाचन व सूत्रसंचालन सौ. सुनिता सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. भाग्यश्री पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या