गगनबावडा : गगनबावडा तालुक्यासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. काल करुळ घाटात दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच, आज (शनिवारी) रात्री सव्वा आठच्या सुमारास भुईबावडा घाटातही मोठी दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने तातडीने युद्धपातळीवर काम करत दोन तासांत दरड हटवून रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.
सलग दुसऱ्या दिवशी दुर्घटना
गगनबावडा तालुक्यात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर अधिक होता. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसाने घाट परिसरात रौद्ररूप धारण केले होते. या अतिवृष्टीमुळे शनिवारी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटातील दुसऱ्या वळणावरील धबधब्याच्या पुढील भागात डोंगराचा काही भाग खचला. मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला आणि घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
यंत्रणेची तत्परता; २ जेसीबींच्या साहाय्याने मार्ग मोकळा
घटनेची माहिती मिळताच गगनबावडा पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही यंत्रणेने तात्काळ दोन जेसीबी पाचारण केले. रात्री पावणे दहाच्या सुमारास रस्त्यावरील दगड आणि मातीचा ढिगारा बाजूला करण्यात यश आले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर भुईबावडा घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
घाट परिसरात सतर्कतेचे आवाहन
गगनबावडा, करुळ आणि भुईबावडा घाट परिसरात सलग दोन दिवस दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास आणखी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वाहनधारकांनी घाट परिसरातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या