सांगली, दि. ६ जुलै : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी पाच दिवसांत सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असून जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली असून आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील पूरप्रवण जिल्ह्यांच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पाणीपातळी, बचाव व मदतकार्याची तयारी, स्थलांतराचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
सांगली विभागात आज सरासरी १४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आयर्विन पुलाची इशारा पातळी ४० फूट, तर धोका पातळी ४५ फूट असून सध्या पाणीपातळी १२.६ फूट इतकी आहे. त्यामुळे सध्या कोणताही तातडीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वारणा धरण सध्या ४२ टक्के भरले असून धरणाची एकूण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. आजअखेर धरणात १४.५९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, कृष्णा नदीवरील बहे (ता. वाळवा), सांगली (ता. मिरज) आणि म्हैशाळ (ता. मिरज) हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात झाला असून मांगले-सावर्डे पुलावर पाणी आल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून मांगले-काखे पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून नागरिकांनी त्याचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले की, सध्या सांगली जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती नाही. मात्र संभाव्य पूरस्थितीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) एक पथक १ जुलैपासून सांगली जिल्ह्यात तैनात असून संभाव्य पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण केली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सर्व संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी व्यक्त केला.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसीलदार लीना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पूरस्थिती वर शासनाची करडी नजर म्हणजे काय करणार. जनता पुरात अडकल्यावर मदतनिधी, अन्नाची पाकिटे असले काही करण्या अगोदर पुरावर नियंत्रण कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नदीतून वाहणारे अतिरिक्त पाणी पुढे जाऊ देण्यापेक्षा ताकारी टेंभू, म्हैशाळ योजना चालू करुन हे अतिरिक्त पाणी जत, आटपाडी किंवा माण खटाव या दुष्काळी भागात टाकावे आणि तेथील बांध बंधारे भरून घ्यावेत म्हणजे त्यांना परतीच्या पावसाची वाट पाहवयास लावण्यापेक्षा पावसाळ्यात पाणी पुरवठा केला तर तेथील दुष्काळ हटण्यास मदत होईल आणि इकडे पुराचे नियंत्रण ठेवण्यास ही मदत होईल. जनतेने यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला पाहिजे.
उत्तर द्याहटवा