सांगली प्रतिनिधी : सांगली शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला आणि संस्कृतीला जपणारे पेठभागचा राजा गोल्डन क्लब गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने यंदा प्रथमच पेठभागच्या राजांचा पाटपूजन सोहळा तसेच रणमर्द ढोल-ताशा व ध्वज पथकाच्या वाद्यपूजन व सराव शुभारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पेठभागचा राजा मंडप, गणपती पेठ, सांगली येथे होणार आहे.
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या नगरीतील मुख्य बाजारपेठेत असलेल्या या मंडळाची स्थापना १९९२ साली पेठभागातील युवकांना एकत्र आणून सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. स्थापनेपासूनच मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना मदत, वृद्धाश्रमात अन्नदान, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी हेल्पलाइन टीम उभारून उल्लेखनीय कार्य मंडळाने केले आहे. २००५, २०१९ आणि २०२१ मधील महापुराच्या काळात पूरग्रस्तांना अन्न, पाणी, जीवनावश्यक वस्तू पुरविणे तसेच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी हेल्पलाइन टीमने मोलाचे योगदान दिले. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय पेठभागातील विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राची पारंपरिक ढोल-ताशा संस्कृती जपण्याच्या उद्देशाने मंडळाने २०१२ साली ढोल-ताशा व ध्वज पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि २०१३ साली 'रणमर्द ढोल-ताशा व ध्वज पथका'ची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून आजपर्यंत या पथकाने आपल्या दमदार वादनातून सांगलीकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले असून गणेशोत्सवातील विविध मिरवणुकांमध्ये आपली खास छाप पाडली आहे.
सध्या रणमर्द ढोल-ताशा व ध्वज पथकात ३५० ते ४०० हून अधिक वादक सहभागी असून पथकाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या सराव शुभारंभ आणि पाटपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने गणेशभक्त, नागरिक व ढोल-ताशा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या