सांगली, दि. २ जून : सांगली जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सांगली जिल्हा को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि., सांगली या संस्थेला मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांची अधिकृत नोंदणी व मान्यता प्राप्त झाली असून, ही बाब जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना कायदेशीर मार्गदर्शन, प्रशिक्षण, जनजागृती तसेच विविध प्रशासकीय प्रश्नांवर संघटित पद्धतीने पाठबळ मिळणार आहे.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २९ जून ते ५ जुलै या कालावधीत देशभर "सहकार सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शनिवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, मुख्य शाखा, पुष्कराज चौक, सांगली येथे सांगली जिल्हा को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनच्या स्थापनेनिमित्त आनंदोत्सव व सहकार सप्ताह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन, विभागीय सह. निबंधक मा. श्री. महेश कदम, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक मा. श्री. सुनील चव्हाण तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त मा. श्रीमती संजीता महापात्रा यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसमोरील विविध प्रश्न, त्यावरील उपाययोजना, महासंघाची उद्दिष्टे, भावी कार्य व दिशा तसेच जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे संघटन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाने यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या