रामानंदनगर, दि. १४ जुलै : राजस्थानातील श्रीगंगानगर येथे १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रामानंदनगर (ता. पलूस) येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नियोजन अमीर पठाण यांनी केले.
या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महिला, माता-भगिनी, युवक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ (श्रीराम मंदिर) येथून मोर्चास प्रारंभ झाला. "महिलांवरील अत्याचार बंद करा", "पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे", "आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे" अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता झाली. तिथे निषेध सभेत महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.
सभेला संबोधित करताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, "समाजात जे चांगले घडते त्याला आपण ज्या ताकदीने पाठिंबा देतो, त्याच ताकदीने वाईट प्रवृत्तींचाही विरोध करणे आवश्यक आहे. गुन्हेगार जितका दोषी आहे, तितकेच त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारेही दोषी आहेत. अन्याय होत असताना शांत राहणे म्हणजे त्या अन्यायाला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखे आहे."
ते पुढे म्हणाले, "आज घटना राजस्थानमध्ये घडली आहे, काही दिवसांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. उद्या अशा घटना आपल्या परिसरातही घडू शकतात. त्यामुळे 'माझा काय संबंध' अशी भूमिका न घेता समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून अशा प्रवृत्तींचा विरोध केला पाहिजे. महाविद्यालयांच्या परिसरात अनेक संशयास्पद टोळकी वावरत असतात. अशा प्रकारांवर राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर तातडीने आळा घालण्याची गरज आहे."
महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले की, "मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे जितके आवश्यक आहे, तितकेच महिलांवर अत्याचार होत असताना समाजाने डोळेझाक न करता तत्काळ पुढे येणेही गरजेचे आहे. समाजानेच गुन्हेगारांवर सामाजिक दबाव निर्माण केला आणि कायद्याने कठोर शिक्षा झाली तर अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. चुकीच्या घटना घडत असताना गप्प बसणे हा देखील मोठा गुन्हा आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाजाने लढा सुरू ठेवला पाहिजे."
सभेत पीडितेला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी समाजात सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मतही उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.
या आक्रोश मोर्चात विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजयदादा शिंदे, अमीर पठाण, तुषार सूर्यवंशी, अभिजीत सावंत, अभिजीत कौलगे, आर.पी.आयचे नेते विशाल तिरमारे, सलमान पठाण, रीयाज पठाण, सर्फराज मुजावर, सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक बबन आण्णा माने, संदीप वाघमारे, सतिश पाटील, युनुस कोल्हापुरे, हरीष दादा वडार, बंडोपंत भागवत, राजु मुजावर, प्रा.घुगरे मॅडम, सावंत मॅडम, आशा गायकवाड, सरीता कुंभार, रुक्साना मुलाणी, मंजिरी शिंदे, दिव्या मोहिते, राणी माने, शोभा वडुलकर, नाझिया पटेल, शिखरे मॅडम, रेश्मा मुल्ला, रेश्मा मुजावर, सुशीला माळी, शालन शिंदे, गीता इंगवले, हिना ईराणी, हुस्नारा ईराणी यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रामानंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या